पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार मुख्यमंत्री


रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज कोकण दौऱ्यावर असून तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला बसला आहे. मुख्यमंत्री आज त्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. अशातच रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी मी आलो असल्याचे म्हणत नुकसानग्रस्त भागातील जनतेला एकप्रकारे मदतीचे आश्वासनच दिले आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करत आहे, मी काही फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नसल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असे सांगितले. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. कोणत्याही परिस्थितीचे मला राजकारण करायचे नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नसल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले आहे.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, मी कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी, हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मागील दोन दिवसांपासून कोकणातील नुकसानीचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत. पण मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करत आहे, फोटोसेशन करायला मी आलेलो नाही.