मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची टीका


मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी कऱण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज कोकण दौऱ्यावर आहेत. दरेकर यांनी त्यासंदर्भात ही टीका केली आहे.

प्रवीण दरेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासियांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाहणी करत असताना विरोधकांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी टीका केली होती. कोकणात विरोधक दोन दिवसांपासून फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलो असल्याचे सांगत मोदींवर निशाणा साधला. विरोधकांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नसल्याचेही ते म्हणाले.

पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवले जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांना टोला लगावला. तसेच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगत मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, येथील विरोधी पक्ष बोलतो तसे मी बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. आपल्याकडे पंतप्रधान आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.