लॉकडाऊनकाळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला हिसका


नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली. निर्धारित वेळेमध्येच अत्यावश्यक सेवांच्या दुकानांनाही खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण, आता लॉकडाऊन अगदी शेवटच्या टप्प्यात असतानाच नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा प्रशासन आणि पोलीस यंत्रणांची डोकेदुखी वाढवत आहेत.

लॉकडाऊनमध्येही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरोधात आता नाशिक पोलिस अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय विविध ठिकाणी भटकणाऱ्यांना येथे पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे. त्याचबरोबर शटर बंद ठेवून दुकान, हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांनाही पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेला सामोरे जावे लागले.

12 ते 23 मे पर्यंत नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येथे केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण, आदेश धुडकावून नागरिक रस्त्यावर फिरणे मात्र टाळताना दिसत नसल्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्यात पोलिस पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. किंबहुना याचे परिणामही दिसत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख काहीसा उतरणीला लागला आहे. पण, अशा बेजबाबदार नागरिकांच्या चुकीमुळे कोरोना संकटाची भीती आणखी बळावत आहे.