आमदारकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता


कोलकाता : आमदारकीसाठी भवानीपूर मतदारसंघातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या ममता बॅनर्जी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शुक्रवारी भवानीपूर येथील आमदारपदाचा तृणमुल काँग्रेसचे आमदार शोभन देव चटर्जी यांनी राजीनामा दिल्यामुळे आता ममता बॅनर्जी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे. भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता यांनी याआधी दोनदा विजय मिळविला होता.

चटर्जी यांनी सांगितले होते की, याबाबत सर्व नेत्यांशी मी चर्चा केली आहे. ममता यांना तिथून निवडणूक लढवायची असल्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर यासाठी कोणताही दबाव नाही. चॅटर्जी म्हणाले की, हा पक्षाचा निर्णय होता आणि मी त्याचे पालन करणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चॅटर्जी हे खर्दा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते काजल सिन्हा यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणूक होणार आहे.

प्रसारमाध्यमांना पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी सांगितले की, चटर्जी यांनी स्वेच्छेने अथवा बळजबरीने राजीनामा दिला आहे का? अशी त्यांच्याकडे चौकशी केली आहे. यावर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांचा राजीनामा मी स्वीकारल्याचे बिमान बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जींना सहा महिन्यांच्या आता विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे. ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडणूक लढावी लागेल आणि विजयी व्हावे लागेल. त्यांना यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. पण सहा महिन्यात विधानसभा सदस्य न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही.