हवाई दलाचे मिग २१ कोसळले, पायलटचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान पंजाब मधील मोगा जिल्ह्यात लांगेयाना गावाजवळ गुरुवारी रात्री साडे आकराच्या सुमारास कोसळले. पायलट अभिनव चौधरी यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री मोठ्या स्फोटाचा आवाज होऊन आग लागल्याचे दिसताच गावकरी घटनास्थळी गेले तेव्हा विमानाचे तुकडे होऊन ते जळत असल्याचे दिसले. विमानाच्या शेपटीकडील भागावरून हे भारतीय हवाई दलाचे विमान असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी अग्निशमन दल, डीएसपी जसविंद सिंग पोहोचले होते पण आगीमुळे काही दिसत नव्हते. हवाई दलाची टीम सुद्धा तेथे पोहोचली. वैमानिकाने पॅराशूट मधून उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता मात्र विमानाच्याच जड उपकरणाबरोबर टक्कर झाल्याने त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

हे विमान सुरतगढ बेसवरून सरावाच्या उड्डाणासाठी गेले होते आणि परत येत असताना त्याला अपघात झाला. ज्या शेतात विमान कोसळले तेथे मोठा खड्डा पडला आहे.