फोर्डच्या पहिल्या इलेक्ट्रिक पिकअप ट्रक एफ १५० लायटनिंगची एन्ट्री

अमेरिकेच्या फोर्ड ने जगाच्या पावलावर पाउल टाकताना इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने त्यांच्या गेली ४० वर्षे सर्वाधिक विक्री होणाऱ्या एफ १५० लायटनिंग पिकअप ट्रकचा इलेक्ट्रिक अवतार सादर केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी टेस्ट ट्रॅकवर हा ट्रक स्वतः चालवून पहिला आणि ट्रक चांगलाच वेगवान असल्याचे कौतुक केले होते.

फोर्डचा हा पहिलाच इलेक्ट्रिक पिकअप ट्रक आहे. नवा ट्रक ग्राहकाला फायदेशीर आहेच शिवाय तो कनेक्टेड टेक्नोलॉजीने युक्त आहे. यात चालकाला ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव घेता येतो. या पिक अप मध्ये ४०० लिटरची बूट स्पेस दिली गेली आहे त्यामुळे तेथे गरजेचे सामान ठेवता येते.

आधुनिक फिचर्स मध्ये या पिकअप ला १२ इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १२ इंची इंफोन्टेन्मेट डिस्प्ले, १५.५ इंची पोट्रेट स्टाईल टच स्क्रीन दिला गेला आहे. ड्युअल मोटर असून चार सेकंदात हा पिकअप ० ते १०० किमीचा वेग घेतो. दोन व्हेरीयंट मध्ये हा ट्रक येतो. स्टँडर्ड व्हेरीयंट फुल चार्ज मध्ये ३७० किमी तर एक्स्टेंडेड व्हर्जन फुल चार्ज मध्ये ४८३ किमी अंतर कापते असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे या पिकअप ट्रकची बॅटरी १० मिनिटात ८७ किमी अंतर कापू शकेल इतकी चार्ज होते.

या पिकअप ट्रकची किंमत ३९,९७४ डॉलर्स म्हणजे ३० लाख रुपये आहे.