बोरीस जॉन्सन यांची करोना आजारात काळजी घेणाऱ्या नर्सने दिला राजीनामा

आयसीयु मध्ये चार दिवस आणि रात्री बोरीस जॉन्सन यांची जीवापाड काळजी घेणाऱ्या परिचारिका जेनी मॅग्की यांनी राजीनामा दिला आहे. ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना गेल्या वर्षी करोना संक्रमण झाले होते आणि त्यांना आयसीयु मध्ये दाखल करावे लागले होते. त्यावेळी जेनी जॉन्सन यांची रात्रंदिवस देखभाल करत होत्या. जेनी यांनी करोना या जीवघेण्या साथीचा सरकारने ज्या पद्धतीने मुकाबला केला त्यावर टीका करून आपला राजीनामा दिला आहे. जॉन्सन याना गेल्या मार्च मध्ये करोना झाला होता आणि त्यातून पूर्ण बरे झाल्यावर त्यांनी जेनी आणि सहाय्यक नर्स लुईस यांची तारीफ केली होती.

‘ द ईअर ब्रिटन स्टॉप्ड, या शीर्षकाखाली चॅनल फोर वाहिनीवर एक डॉक्युमेंटरी बनविली गेली असून तिचे प्रसारण २४ मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमात जेनी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, करोना काळात आम्ही जीव पणाला लावून चिक्कार कष्ट केले, मेहनत घेतली. परिचारिका, डॉक्टर हिरो आहेत याच्या गप्पा ऐकल्या. पण हे सारे मी पुन्हा करू शकेन असे मला वाटत नाही. या कामाबद्दल आम्हाला सन्मान राहू दे पण वेळेवर पगार सुद्धा मिळाले नाहीत. वास्तविक हा आमचा हक्क आहे.

जेनी मूळच्या न्यूझीलंडच्या आहेत. त्या म्हणतात, ब्रिटन मध्ये करोना मुळे १,२७,९५६ मृत्यू झाले. सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत. ब्रिटन मध्ये संक्रमितांची संख्या ४,४६८,३६६ इतकी आहे. सरकारने या वर्षी राष्ट्रीय आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १ टक्का पगारवाढ जाहीर केली आहे.