कोविड १९ लसीमुळे करोना संकटात सुद्धा बनले ९ नवे अब्जाधीश  

द पीपल्स वॅक्सिन अलायंस या संस्थेच्या रिपोर्ट नुसार कोविड लस विक्रीतून झालेल्या फायद्यामुळे जगात नऊ नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. गुरुवारी हा अहवाल सादर झाला आहे. त्या नुसार या नऊ जणांच्या संपत्तीत १९.३ अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण १४१ कोटींची भर पडली आहे. ही संस्था विभिन्न संघटना आणि कार्यकर्त्यांचा गट आहे. या गटाकडून कोविड १९ लसीचे पेटंट संपविले जावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या गटाच्या म्हणण्यानुसार नवीन अब्जाधीशानी गरीब देशांना गरजेनुसार लस उपलब्ध करून दिली तर त्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा त्यांना मिळालेला पैसा दीड पटीने अधिक आहे.

ऑक्सफॅम संघटना या गटची सदस्य असून या संघटनेच्या अॅना मॅरियट म्हणतात, लसीचे पेटंट घेऊन लस निर्मिती एकाधिकारातून कमावलेला हा पैसा म्हणजे त्यातील नफ्याचा मानवी चेहरा आहे. लस विक्रीतून हे नऊ नवे अब्जाधीश जसे बनले आहेत, त्याचप्रमाणे अगोदरच अब्जाधीश असलेल्या अन्य आठ जणांच्या संपत्तीत सुद्धा ३२.३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

नवीन अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे स्टीफन बँरन, बायोएनटेकचे उगुर साहीन यांचा समावेश असून चीनी कॅनसिनो चे संस्थापक आणि अन्य दोघे आहेत. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या पूनावाला यांची संपत्ती गतवर्षीच्या २.२ अब्ज डॉलर्स वरून करोना काळात १२.७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. कॅडिलाचे चेअरमन पंकज पटेल यांची संपत्ती सुद्धा गतवर्षीच्या २.९ अब्ज डॉलर्स वरून ५ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.