या महिन्यात ओसरणार कोरोनाची दुसरी लाट; तर सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट


नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. तसेच दुसरी लाट जुलैमध्ये ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज यावेळी समितीने वर्तवला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यात आधीच कोरोनाबाधितांच्या संख्येने शिखर गाठले असल्याचे समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे. मॉडेलनुसार, २९ मे ३१ मे दरम्यान तामिळनाडूत आणि १९ ते २० मे दरम्यान पुद्दुचेरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतातील पूर्व आणि ईशान्य राज्यांनी अद्याप रुग्णवाढ पाहिलेली नाही. पण २०-२१ मे आसाममध्ये, ३० मे मेघालयमध्ये आणि २६-२७ मे रोजी त्रिपुरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचे शिखर गाठले जाऊ शकते. दरम्यान उत्तरेकडे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या रुग्णवाढ दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये २४ मे आणि पंजाबमध्ये २२ मे रोजी मोठी रुग्णवाढ पहायला मिळू शकते.

Susceptible, Undetected, Tested (positive), Removed Approach मॉडेलचा वापर केल्यास मे महिन्याच्या अखेर दिवसाला दीड लाख आणि जून महिन्याच्या अखेर दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. मॉडेलनुसार, सहा ते आठ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. प्रतिकारशक्ती लसीकरणामुळे वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील, अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.