राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा


मुंबई – भारतीय संघ माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेचा दौरा करणार आहे. जुलैमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी बीसीसीआय एक नवीन टीम पाठवेल. या दौऱ्यात पुढील महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंचा समावेश असणार नाही.

या नव्या संघात द्रविड सामील होतील. याची अधिकृत घोषणा अद्याप बीसीसीआयने केलेली नाही. वरिष्ठ भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी सामील होण्याची द्रविड यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये द्रविड इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत होते.

द्रविड हे NCA मध्ये सामिल होण्यापूर्वी इंडिया ‘A’ आणि इंडिया अंडर -19 संघाचे प्रशिक्षक होते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, टीम इंडियाच्या कसोटी पथकासह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक आरएस श्रीधर, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह सर्व प्रशिक्षक कर्मचारी इंग्लंड दौऱ्यावर असतील.

बीसीसीआयचे याबाबत अधिकारी म्हणाले की द्रविडकडून अशा परिस्थितीत यंग टीम इंडियाला मार्गदर्शन मिळेल ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वी इंडिया-A बरोबर काम केले आहे. या दौऱ्यावरही यामधूनच युवा खेळाडू भारतीय संघासाठी निवडले जातील. यामुळे द्रविड त्यांच्यासोबत चांगले जुळवून घेतील.