केंद्र सरकारकडून तोक्ते चक्रीवादळग्रस्त महाराष्ट्रालाही मिळणार मदत – फडणवीस


महाड – केंद्र सरकार तोक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना मदत करणार असून त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार असल्याचे केंद्र सरकारने हे कालच स्पष्ट केले आहे. पण, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे आज सकाळी माध्यमांशी बोलताना महाविकासआघाडी सरकारवर केला आहे.

फडणवीस म्हणाले, गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा लॅण्डफॉल झाला. त्याठिकाणी ४५ जणांचा मृत्यू झाला आणि खूप मोठ्याप्रमाणात गावे उध्वस्त झाली. म्हणून काल पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले, त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी मदत घोषित केली. त्या मदतीची जी प्रेस नोट आहे त्यातच उल्लेख केलेला आहे, की अन्य राज्यांना देखील यामध्ये मदत होणार आहे.

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेश इतक्या राज्यांमध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान झालेले आहे. कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्याने त्या बद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेले आहे. की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यामध्ये केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपची राज्य नाही किंवा आपण दुसरा विचार केला, तर गोवा व कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत. तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे.

या सगळ्या राज्यांना केंद्राकडून मदत मिळणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे आगाऊ देते. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशाप्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले. केंद्र सरकार ते परत करत असते किंवा नव्याने देत असते, ते पैसे केंद्र सरकारचेच असतात. हे सगळे राज्याला माहिती असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे. राज्याला निश्चितपणे मदत केंद्र सरकार करेल. आठही राज्यांना करेल व महाराष्ट्राला देखील मदत होईल.

त्याचबरोबर, दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याचे कालच राज्याने जाहीर केले. या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एबीपी माझाच्या एका मुलाखतीदरम्यान बोलताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अजूनही निसर्ग चक्रीवादळाची भरपाई मिळालेली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. त्यांना सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.