मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही; छत्रपती संभाजीराजेंचा भाजपला घरचा आहेर


नाशिक – २७ तारखेला मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडणार असून त्यानंतर कोणी माघार घेतली, तर बघाच असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार आणि खासदारांना नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. त्यांनी यावेळी भाजपला घरचा आहेर देत तोडगा सांगा, मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो, यावर बोला असे आवाहन करत मी काही भाजपचा ठेका घेतलेला नसल्यायचे म्हणत सुनावले आहे.

आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका भाजपने घेतली आहे, यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांनी त्यांची भूमिका बघावी. त्यासाठी मी काय ठेका घेतलेला नाही. तोडगा काय आणि मराठा समजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यासंबंधी बोला. बोगस कायदा मागच्या सरकारने केला की आताच्या सरकारने योग्य मांडणी केली नाही, याच्याशी आम्हाला काही करायचे नसल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाजारांची, राजर्षी शाहू महाराजांची आणि समाजाची भूमिका मी मांडत असतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य आणि केंद्रात गेल्या काही दिवसात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कोणी ही राज्याची जबाबदारी तर कोणी केंद्राची जबाबदारी असल्याचे म्हणत आहे. याच्याशी मराठा समाजाला काही देणे घेणे नसून तुम्ही मार्ग काय काढून देणार आहात ते सांगा, अशी विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

समंजसपणाची भूमिका मी घेतली होती, त्यावर शंका घेण्यात आली. माणसे जगली तर आऱक्षणासाठी लढू शकतो. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसे करायचे हे शिकवण्याची गरज नाही. जे मी बोलतो ते करुन दाखवतो. एकदा पाय टाकला तर माघार नाही आणि हे मी करुन दाखवले आहे. २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. एवढा मोठा अलिशान वाडा असतानाही महिन्यातील चारच दिवस तिथे राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र फिरुन भावना समजून घेणार आहे. मुंबईत येत्या २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर मी माझी भूमिका मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मांडणार. पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचे आहे की, समाजाची भावना मांडल्यानंतर माझे तुझे केले तर याद राखा, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला आहे.

जर कोणी मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. मी अद्यापही आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी केवळ दोन मिनिटे लागतील, पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही. २७ तारखेला मराठा समाज काय करणार हे सर्वांना कळेल. पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावे. आपला जीव धोक्यात घालू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आताच्याही मुख्यमंत्र्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या हातात आहे ते करा ना, सर्वोच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला असला तरी सप्टेंबर २०२० च्या आधी असणाऱ्या नियुक्त्या करण्यास सांगितले आहे. मग का थांबला आहात? सारथीसाठी एवढे लढलो, मी रस्त्यावर जाऊन बसलो. पण त्यांचे काय झाले? अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठा समाजाला दिशा देण्याचे मी काम करत आहे. राज्य किंवा केंद्र सरकार असो एकमेकांवर ढकलाढकल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी चार वेळेला पत्र दिले. पण अद्यापही मला भेटीसाठी त्यांनी वेळ दिलेली नाही. पुन्हा एकदा मुद्दा मांडेन, समाजासाठी मी कुठेही आवाज उठवण्यास तयार आहे. मी कोणाला घाबरत नाही. सर्व समजून मी २७ तारखेला भूमिका मांडेन. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करेन, काही ठरत नसेल तर समाज आपली भूमिका स्पष्ट करेल आणि मी समाजासोबत असल्याचे ते म्हणाले.