हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल


मुंबई : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानी याच्याविरोधात हिंदू देवतांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानीने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जालनातील अंबड भागात राहणारे अंबादास अंबोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. अंबादास यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटले की, ट्विटरवर उस्मानीने काही ट्विट केले आहेत. त्यात राम यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. त्याचबरोबर उस्मीनच्या ट्विट्समुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय संविधानानुसार कलम 295-ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास आंबोरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी उस्मानीविरोधात हा गुन्हा दाखल केला. दरम्यान अंबोरे हे हिंदू जागरणशी संबंधित असल्याचे समजते.

शरजील उस्मानी याने याआधीही हिंदुत्वावर टीका केली आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात उस्मानीने एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका केली होती. त्याने एल्गार परिषदेत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे उस्मानीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.