१०९ वर्षापूर्वी बुडालेले टायटॅनिक प्रत्यक्षात जवळून पाहण्याची संधी

१४-१५ एप्रिल १९१२च्या थंडगार रात्री प्रचंड मोठ्या हिमनगाला धडकल्यामुळे पहिल्याच समुद्र सफरीत, ‘कधीच न बुडणारे’ अशी जाहिरात झालेल्या अलिशान टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळाली हा इतिहास आता सर्वाना माहिती आहे. अतिप्रचंड आणि अतिशय सुंदर बांधलेले हे जहाज त्यावेळी शेकडो प्रवाशांचे कबरीस्थान बनले होते. या जहाजाला अगदी जवळून प्रत्यक्ष पाहण्याची संधी ओशनगेट एक्स्पीडीशन या पाण्याखालचे जग शोधणाऱ्या कंपनीने आणली आहे. द टायटॅनिक सर्व्हेक्षण २०२१ प्रोजेक्ट खाली ही संधी मिळू शकणार आहे. या कंपनीने टायटॅनिक सफरीची घोषणा नुकतीच केली आहे.

फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार या साठी कंपनीने टुरिस्ट पॅकेज जाहीर केले असून त्यासाठी १लाख २५ हजार डॉलर्स म्हणजे ९१,४६००० रुपये मोजावे लागणार आहेत. समुद्राखाली १० दिवस राहणे, टायटॅनिकचे जवळून निरीक्षण आणि प्रत्यक्ष स्पर्श करण्याची संधी यात आहे. अर्थात कुणीही या सफरीवर जाऊ शकणार नाही. तर अर्ज आलेल्यांपैकी कोण जाऊ शकेल याची निवड तज्ञ समिती करणार आहे.

बेलफास्ट मध्ये बनविले गेलेले टायटॅनिक हे अतिभव्य आणि अलिशान जहाज २२२३ प्रवाशांसह त्यांच्या न्युयॉर्कच्या पहिल्या सफरीवर १४ एप्रिल १९१२ रोजी निघाले. त्याच रात्री उत्तर अटलांटिक समुद्रात एका हिमनगाला टक्कर दिल्याने त्याचे दोन तुकडे झाले आणि बर्फाळ समुद्रात त्याला जलसमाधी मिळाली. त्यात १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. ९७ वर्षाच्या सततच्या शोधानंतर वैज्ञानिकांना १९८५ मध्ये अटलांटिक समुद्रात सुमारे १२४६७ फुट खोल पाण्यात टायटॅनिकचा ठावठिकाणा मिळाला होता.

यानंतर आलेल्या टायटॅनिक या चित्रपटाने लोकप्रियतेचे रेकॉर्ड नोंदविले होते. आता हे जहाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी आली आहे. पाणबुडीतून हा प्रवास होणार असून त्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.