सरोवरात बुडालेल्या गावाचे ९१ वर्षानंतर दर्शन

इटली मधील रेसिया सरोवर नुकतेच चर्चेत आले आहे. या सरोवरात १४ व्या शतकातील एक चर्चचा मिनार असून त्यामुळे हे सरोवर अगोदर प्रसिध्द होते पण आता ते नव्याने चर्चेत आले आहे ते सरोवराखाली बुडालेल्या जुन्या गावाचे अवशेष दिसू लागल्याने. या गावाचा इतिहास जाणून घेण्यासारखा आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार अनेक वर्षानंतर या सरोवराच्या दुरुस्ती कामासाठी सरोवरातील पाणी सुकविले गेले आहे. त्यामुळे अनेक दशके या सरोवराखाली बुडालेल्या एका गावाचे अवशेष आता दिसू लागले आहेत. ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर असलेल्या या सरोवराला जर्मन मध्ये रेस्चेन्सी म्हणतात. १९५० मध्ये हायड्रोइलेक्ट्रिक प्लाँट बनविण्यासाठी येथे पाणी अडविणे आवश्यक होते आणि त्यानुसार तेथे एक धरण बांधले गेले.

यामुळे क्युरोन नावाचे एक गाव पूर्ण धरणाच्या पाण्याखाली गेले. येथे त्याकाळी शेकडो रहिवासी होते. सुमारे १६० घरे या धरणात बुडाली. गावातील लोकांनी आसपास नवे गाव वसवून वस्ती केली. या गावातील चर्च पण पाण्याखाली बुडाले होते. पण त्याचा मनोरा पाण्यावर दिसत असे.

या गावाची रहिवासी लुईसा हिने पाण्याबाहेर आलेल्या गावाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ती म्हणते, गावाच्या अवशेषांमधून फिरताना वेगळीच भावना मनात दाटते आहे. हे गाव उन्हाळ्यात हायकर्सना विशेष आवडीचे होते आणि थंडीत बर्फ जमल्यावर त्यावरून चर्चच्या शिखरावर जाण्याचा आनंद लुटता येत असे. हे गाव पूर्वी ऑस्ट्रियाचा भाग होते मात्र पहिल्या महायुद्धात इटलीने त्यावर कब्जा केला. आजही येथील बरेच लोक जर्मन भाषिक आहेत.