प्रिन्स हॅरी-मेगन विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत करोना केंद्र उभारणार

ब्रिटीश राजघराण्याचा त्याग करून बाहेर पडलेला प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी त्यांच्या विवाहाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचा निमित्ताने एक घोषणा केली आहे. डॉमनिका येथे आर्चवेल फौंडेशनने उभारलेल्या एक इमारतीप्रमाणेच एक इमारत मुंबई मध्ये उभारली जाणार असून तेथे स्थानिकांना करोना लस, खाणेपिणे आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. आर्चवेलच्या वेबसाईटवर ही घोषणा केली गेली आहे.

प्रिन्स हॅरी म्हणतात, भारतात करोनाचा प्रसार अधिक होतो आहे त्यामुळे करोना केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरजूंना सहाय्य, ताकद आणि मदत मिळू शकेल. भारतात करोनाने लाखो बळी घेतले आहेत. अनेक नागरिक संक्रमित आहेत. त्यामुळे आर्चवेल फौंडेशन, वर्ल्ड सेंट्रल किचन मुंबई येथे हे केंद्र सुरु करत आहे. येथेच मायना महिला नावाची भारतीय संस्था असून त्यालाही हॅरी आणि मेगन यानी समर्थन दिले आहे.

या जोडप्याने यापूर्वी जगभर करोना लसीचे समान वितरण व्हावे अशी मागणी केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गरीब देशांसाठी लस उत्पादक कंपन्यांनी पेटंट हटवावे अशी सूचना केल्यावर त्याचेही या जोडप्याने स्वागत केले होते.