काल दिवसभरात देशात 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : कोरोनामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूचा आकडा भयावह असून हा आकडा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. जगभरातील इतर अनेक देशांचे सर्व रेकॉर्ड या आकड्याने मोडीत काढले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले होते. परंतु, हा रेकॉर्ड आता भारताने मोडीत काढला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद देशात करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4529 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3,89,851 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत 12 जानेवारी रोजी जगभरात सर्वाधिक 4468 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

देशभरात 18 मेपर्यंत 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काल दिवसभरात 13 लाख 12 हजार 155 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20.08 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.10 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 85 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून 13 टक्क्यांवर आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत जगात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.