लहान मुलांच्या फेरारीला लिलावात १ कोटीपेक्षा अधिक किंमत

पॅरीस येथे नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात लहान मुलांची फेरारी ३३० पी २ ज्युनियर या गाडीला १४५,४४५ डॉलर्स म्हणजे १,०६,५८,०७८ रुपये इतकी किंमत मिळाली आणि नवीन वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. आरएम सोथबे पॅरीस ऑक्शन कंपनीने हा लिलाव केला. लहान मुलांच्या कार साठी मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. फ्रेंच कोच बिल्डर डी ला चॅपल यांनी ही कार बनविली होती.

यापूर्वी २०१३ साली न्युयॉर्क मध्ये १९५८ साली बनविल्या गेलेल्या फरारी २५० टेस्टा रॉस्सा मॉडेलच्या प्रतिकृतीला १२६,५०० डॉलर्स बोली लागली होती. म्हणजे ९३ लाखात ती खरेदी केली गेली होती. मार्च २०१५ मध्ये आरएम सोथबेच्या अमेमिया बेटावर चॅरिटी लिलाव केला गेला होता. डी ला चॅपेलच्या फेरारी ३३० पी २ ज्युनिअर चाईल्ड कारला लागलेली ही पहिली बोली होती. त्यावेळी ती ६६१२५ डॉलर्स म्हणजे ४८ लाख रुपयांना विकली गेली आणि हा सर्व पैसा दान केला गेला होता.

त्यानंतर या लहान मुलांच्या मॉडेल कारची किंमत दर लिलावात वाढत गेली आणि आता ती कोटी पार गेली आहे.