बालाजी मंदिरातील लक्षाधीश याचक

आंध्र प्रदेशातील जगप्रसिध्द तिरुपती बालाजी देवस्थान सर्वाधिक दान येणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. भारतात बहुतेक धार्मिक स्थळावर भिकारी मोठ्या संखेने दिसतात. तिरुपती बालाजी मंदिरात एका याचकाच्या मृत्युनंतर त्याच्या कडे सापडलेल्या संपत्तीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. व्हीआयपी भाविकांना गंध लावून त्याबदली पैसे मागणाऱ्या याचकाचा नुकताच मृत्यू झाला. श्रीनिवासन असे त्यांचे नाव असून तो ६४ वर्षाचा होता.

तरुणपणीच बालाजी मंदिरात दाखल झालेला श्रीनिवासन मृदू भाषी होता त्यामुळे अनेकांना तो आवडत असे. मंदिरात येणाऱ्या बड्या भाविकांना तिलक म्हणजे गंध लावून तो दक्षिणा मागत असे. दक्षिणा मिळेपर्यंत तो भाविकाचा पिच्छा सोडत नसे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका कडून सुद्धा त्याने भली थोरली दक्षिणा मिळविली होती असे सांगतात. गेले वर्षभर त्याचा शेषाचल नगर मधील एका खोलीवर कब्जा करण्याचा प्रयत्न काही जण करत होते.

शेवटी श्रीनिवासन याच्या शेजाऱ्यांनी ही बाब देवस्थान आणि पोलिसांच्या कानावर घातली. तेव्हा श्रीनिवासनची खोली उघडली गेली. त्यात दोन पेट्या आणि किरकोळ सामान होते. पण जेव्हा दोन पेट्या उघडल्या गेल्या तेव्हा त्या नोटांनी गच्च भरलेल्या होत्या. शेवटी महसूल विभागच्या टीमने हे पैसे मोजले तेव्हा ही रक्कम ६ लाख १५ हजार रुपये भरली. ही सारी संपत्ती सरकारी खजिन्यात जमा करण्यात आली असे समजते.