टीम इंडियाला करोना लसीचा दुसरा डोस इंग्लंड मध्ये

आगामी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप आणि इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया २ जून रोजी इंग्लंडला रवाना होत आहे. टीम मधील ज्या खेळाडूंना करोना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे पण दुसरा डोस मिळालेला नाही त्यांना दुसरा डोस देण्याची जबाबदारी युकेच्या आरोग्य विभागाने घेतली असल्याचे समजते. नियमानुसार पहिल्या डोस नंतर आवश्यक कालावधी झाल्यावर हा दुसरा डोस दिला जाणार आहे.

बीसीसीआयने या दौऱ्याची पूर्ण योजना तयार केली आहे. त्यानुसार टीम मध्ये सामील असलेले सर्व खेळाडू आज मुंबईत दाखल होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी घरीच तीन वेळा आरटी पीसीआर टेस्ट करून घेतली असून टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट येथे दाखवावा लागणार आहे. त्यानंतर मुंबई मध्येच या खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. दोन जून रोजी टीम इंग्लंडला रवाना होणार आहे. साडे तीन महिने टीमचा मुक्काम इंग्लंड मध्ये असणार आहे.

टीम मध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कप्तान), अजिंक्य राहणे (उपकप्तान), हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर, अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, ऋधीमान साहा यांचा समावेश असून स्टँडबाय म्हणून अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध्द कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला यांची निवड केली गेली आहे. वर्ल्ड टेस्ट मधला भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.