करोना, काळी बुरशी उपचारासाठी जळूचा वापर करण्याचा प्रयोग

रक्त शोषून घेणारी जळू अनेकांना माहिती असेल. आयुर्वेदिक उपचारात या जळवांचा वापर अनेक रोगात उपचारासाठी केला जातो. इतकेच नव्हे तर आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी यांच्या हातात सुद्धा जळू धरलेली दिसते. म्हणजेच उपचारात जळूचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. बिहार राज्यात आजकाल या रक्त शोषणाऱ्या जळू किंवा जळवांचा शोध डॉक्टर घेत आहेत. करोना नंतर उद्भवत असलेल्या काळी बुरशी रोगावरील उपचारात या जळवांचा उपयोग होऊ शकेल असा विश्वास वैद्य व्यक्त करत असून तसे प्रयोग करण्याची तयारी सुरु झाली आहे असे समजते. अर्थात सरकारने अश्या उपचारांना संमती दिलेली नाही.

जळू ही माणसाच्या शरीरातील अशुद्ध रक्त शोषून घेते आणि मृत पेशी नष्ट करते. शरीरात जेथे जेथे त्वचा खराब झाली आहे, रक्तप्रवाह बंद पडला आहे तेथे जळू महत्वाची भूमिका बजावते. जळवा दोन प्रकारच्या असतात. एक विषारी आणि दुसरी बिनविषारी, बिनविषारी जळवा उपचारासाठी वापरल्या जातात. या दोन्ही जळू मधील फरक सहज ओळखता येतो. विषारी जळू काळी असते तर बिनविषारी हिरवट आणि चिकट त्वचा असलेली असते. तिच्या अंगावर केस नसतात.

करोना मधून बरे झालेल्या रुग्णात काळी बुरशी विकार वेगाने फैलावत असून मुकोरमाईकोसीस(काळी बुरशी) या समस्येने मोठे आव्हान उभे केले आहे. आयुर्वेद उपचारात शरीरात कोठेही झालेली अनैसर्गिक वाढ, डोळे सुजणे या सारख्या विकारांवर जळू वापर दीर्घकाळ केला जात आहे. डोळ्याजवळ रक्त साठले असेल तर जळू लावून ते काढले जाते आणि त्वचा नॉर्मल होते. जळूचा असाच उपयोग डोळ्याजवळ वाढणाऱ्या काळ्या बुरशीसाठी करता येईल असा विश्वास डॉक्टर व्यक्त करत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही