कोरोनामुक्त झालेल्यांना एवढ्या महिन्यांनंतर देण्यात यावी लस; सरकारी समितीचा सल्ला


नवी दिल्ली – कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर कोरोनाची लस देण्याचा सल्ला केंद्र सरकारच्या एका समितीने दिला आहे. हा सल्ला लसीकरणासंदर्भातील अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या समितीने दिला आहे. यापूर्वी सीरम इन्स्टिट्युटच्या कोव्हिशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या समितीने दिला होता. याच समितीने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचे लसीकरण नऊ महिन्यांनी करण्यात यावे असा सल्ला दिला आहे.

यापूर्वीच कोव्हिशिल्डच्या दोन डोसांमधील अंतर वाढवण्यास एनटीएजीआयने सांगितले आहे. आधी या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे एवढे होते. तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनलने दोन डोसांमधील अंतर किती असावे यासंदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावे, असे म्हटल्याचे समजते.

समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल. यासंदर्भात इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना कोरोनामुक्तीनंतर किती महिन्यांनी लस देण्यात यावी, याचा कालावधी वाढवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर कोरोनाची लस गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही देण्यात यावी, असा सल्लाही या समितीने दिला आहे. यासंदर्भातील निर्णय पुढील काही दिवसांमध्ये आरोग्य मंत्रालय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सहा महिन्यांचे अंतर सुरक्षित आहे.

यापूर्वीच एनटीएजीआयने स्पष्ट केले आहे की, पहिला डोस ज्या लोकांनी घेतला आणि दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यामधून बरे झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यांनंतर त्यांनी लसीचा पुढचा डोस घेतला पाहिजे. ज्या रुग्णांनी मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडीजच्या मदतीने किंवा कानव्हलेसंट प्लाझ्मा उपचारांच्या मदतीने कोरोनावर मात केली आहे, त्यांनी लसीचा डोस तीन महिन्यानंतर घेतला पाहिजे.