भारतीय वंशाच्या टॅक्सी चालकाच्या मुलाची ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात वर्णी


सिडनी-आगामी विंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने २३ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांचे पुनरागमन झाले आहे, पण या खेळाडूंमध्ये मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेनचे नाव समाविष्ट नाही. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी भारतीय वंशाचा १९ वर्षीय प्रतिभावान फिरकीपटू तन्वीर संघा याचीही निवड झाली आहे. मार्चमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ न शकलेल्या सात खेळाडूंमध्ये फलंदाज स्मिथ, वॉर्नर आणि कमिन्स यांचा समावेश होता. त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आधीच निवड झाली होती. पण हा दौरा रद्द करण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेत २०२०साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये तन्वीर संघाने आपली कामगिरीची चुणूक दाखवली होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवता आले नाही, परंतु तन्वीरने या स्पर्धेत सर्वाधिक १५ बळी घेतले. या कामगिरीनंतर तो ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीच्या नजरेत आला.

एखाद्या चित्रपटासारखी तन्वीरचे वडील जोगा संघा यांची कहाणी आहे. जालंधरजवळील रहिमपूरहून ते ऑस्ट्रेलियाला आले. जोगा १९९७ साली ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी गेले, पण ते तिथेच राहिले. सिडनीमध्ये ते टॅक्सी चालक म्हणून काम करतात, तर तन्वीरची आई एक लेखापाल आहे. तन्वीरने ऑस्ट्रेलियाच्या संघात एन्ट्री घेऊन त्याच्या आई-वडिलांचे नाव उंचावले आहे. तो आता भारतात आयपीएल कधी खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.