अपोलो हॉस्पिटलमध्ये Sputnik Vच्या एका डोससाठी मोजावे लागणार एवढे पैसे


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता आणखी एका लसीची भर पडली आहे. रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही ही कोरोना प्रतिबंधक लस कोविन (CoWin) अॅपवर आता बुकींगसाठी उपलब्ध झाली आहे. याआधी 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस दिली जात होती.

स्पुटनिक-व्हीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने अपोलो हॉस्पिटलसोबत करार केला आहे. त्यानुसार स्पुटनिक व्हीची लस हैदराबादच्या जुबली हिल्समधील अपोलो रुग्णालयात दिली जात आहे. यानंतर विशाखापट्टनम, दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यात देखील रशियाची ही व्हॅक्सीन उपल्बध होणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अपोलो हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक-व्हीच्या एका डोससाठी 1250 रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामध्ये रुग्णालयाच्या चार्जेसचा देखील समावेश आहे. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजने माहिती दिली होती की, स्पुटनिक व्हीची किंमत 948 रुपये आहे. ज्यावर 5 टक्के जीएसटी लागत आहे. ज्यामुळे वॅक्सीनची किंमत 995.4 रुपये होते. यामध्ये हॉस्पिटलचे चार्जेस जोडून त्याच्या एका डोसची किंमत 1250 रुपये आहे.

1 मे रोजी भारतात रशियाची स्पुटनिक-व्हीची पहिली खेप आली होती. यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने लसीची किंमत जाहीर केली होती. 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्स रेगुलेटरी अथॉरिटीने याला मंजुरी दिली.