कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केला तृणमुलच्या मंत्र्यांसह चार नेत्यांचा जामीन


कोलकाता – पश्चिम बंगालमधील राजकारण नारदा स्टिग प्रकरणामुळे पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. ममता बॅनर्जी सरकारमधील दोन मंत्र्यांसह तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना अर्ध्या रात्री कारागृहात पाठविण्यात आले आहे. तत्पूर्वी या सर्वांचा जामीन कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केला. सीबीआयने सोमवारी छापेमारीनंतर या सर्व नेत्यांना अटक केली होती. सीबीआयच्या या कारवाईनंतर, बंगालमधील पराभव पचवणे मोदी सरकारला जड जात असल्यामुळेच ते अशा प्रकारची बदल्याची कारवाई करत असल्याचे तृणमूलने म्हटले आहे.

या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तृणमुलचे नेते फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, माजी टीएमसी नेते आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना जामीन दिला होता. पण, कोलकता उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. पक्षाच्या नेत्यांना झालेल्या अटकेविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीबीआय कार्यालयात सहा तास धरणे दिले होते. तर त्यांच्या समर्थकांनी परिसराला घेराव घातला होता. तसेच सीबीआयच्या या कारवाईविरोधात राज्यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली.