इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे भारताचे सामने फिक्स नव्हते – आयसीसी


दुबई : ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (२०१६) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (२०१७) झालेले सामने फिक्स असल्याचा केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) खोडून काढला आहे. यापैकी कोणतेही सामने फिक्स नव्हते, त्याचबरोबर ‘अल जझीरा’ने केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे.

एका लघुपटात ‘अल जझीरा’ने भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१६ साली चेन्नई येथे खेळवला गेलेला तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ साली रांची येथे खेळवला गेलेला सामना फिक्स असल्याचे म्हटले आहे. या लघुपटात आरोप केलेल्या पाच व्यक्तींनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. या वाहिनीला कोणतेही सबळ पुरावे देता आले नसल्याचही ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

याप्रकरणी आयसीसीने चौकशी समिती नेमली होती. ‘दोन सामने फिक्स झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. पण कोणत्याही प्रकारे सामना फिक्स होता, याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही सट्टेबाजी आणि क्रिकेटमधील तज्ज्ञमंडळींची वैयक्तिक चौकशी समिती नेमली होती. या चारही जणांनी सामन्याचा कोणताही भाग फिक्स करण्यात आलेला नसल्याचे मत मांडल्याचे ‘आयसीसी’च्या पत्रकात म्हटले आहे.

‘आयसीसी’ कोणत्याही नावाचा उल्लेख केला नसला तरी पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझा, श्रीलंकेचा थरंगा इंडिका आणि थारिंडू मेंडिस तसेच मुंबईचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस यांची चौकशी करण्यात आल्याची चर्चा आहे.