दिलासादायक! देशासह राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट


नवी दिल्ली/मुंबई – कोरोना महामारीने देशात थैमान घातले असतानाच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, देशात काल दिवसभरात कोरोनामुळे 4329 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तर चार लाख 22 हजार 436 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात 19 एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 19 एप्रिल 2021 रोजी देशात दोन लाख 59 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

आज 9 राज्यांच्या 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि चंदीगढच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या दरम्यान, त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

तमिळनाडू, कर्नाटक, आसाम, गोवा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, एमपी, उत्तराखंडमधील जिल्हाधिकारी, चंडीगडचे प्रशासकीय अधिकारी आणि राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या या बैठकीत उपस्थित आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचीस नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांनंतर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. काल (सोमवारी) तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर काल नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान काल 516 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.