…यामुळे 23 मे 2021 रोजी 14 तासांसाठी बंद रहाणार एनईएफटीची सेवा


नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एनईएफटीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली असून त्या माहितीनुसार 23 मे 2021 रोजी रात्री 12 वाजून एक मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत एनईएफटीची सेवा बंद राहणार आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की, ही सेवा एनईएफटीची प्रोसेस आणखी सुलभ करण्याच्या उद्देशानं एका दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक पत्रक जारी करत माहिती दिली. त्याचबरोबर यासंदर्भात एक ट्वीटही केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एनईएफटी सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जात आहे. 22 मे 2021 रोजीचे काम बंद झाल्यानंतर हे अपग्रेडेशन केले जाईल. त्यामुळे 22 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे.


त्याचबरोबर आरबीआयने असेही म्हटले आहे, की सदस्य बँका रविवारी एनईएफटी सेवेमध्ये उद्भवलेल्या अडथळ्यानुसार त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पेमेंट योजना बनविण्यास सांगू शकतात. एनईएफटी सदस्यांना एनईएफटी सिस्टमद्वारे अपडेट्स प्राप्त होतील. यावेळी आरटीजीएस सेवेवर परिणाम होणार नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.