अरविंद केजरीवाल यांची केंद्राला सिंगापूरहून येणारी विमानसेवा तात्काळ बंद करण्याची विनंती


नवी दिल्ली – देशातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोलमडून पडल्याचे चित्र होते. याच दरम्यान वैज्ञानिकांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सिंगापूर येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सिंगापूर येथे आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा स्ट्रेन लहान मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत प्रामुख्याने काम करण्याची त्यांनी मागणी केली आहे. सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन विषाणू लहान मुलांसाठी धोकादायक मानला जात आहे. हा तिसऱ्या लाटेच्या रुपात भारतात येऊ शकतो. माझी केंद्र सरकारला विनंती आहे. सिंगापूरसोबत सुरु असलेली विमान सेवा तात्काळ बंद करावी. लहान मुलांच्या लसीकरणासाठीसुद्धा प्रामुख्याने काम करण्यात यावे, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट ही धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आल्यामुळेच केजरीवाल यांनी लहान मुलांच्या देखील लसीकरणासाठी काम करण्याची विनंती केली आहे.