देशातील कोरोना लसीकरणाबाबत अदर पूनावालांची मोठी माहिती


नवी दिल्ली – एकीकडे देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असतानाच दूसरीकडे देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. देशातील कोरोना लसी इतर देशांना का दिल्या याबाबत सोशल मीडियावर सध्या मोठी चर्चा होत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर सीरम इंस्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रक पोस्ट केले आहे. भारतीयांच्या वाट्यातील लसी निर्यात केल्या नसल्याचे स्पष्टीकरण अदर पूनावाला यांनी या पत्रकाद्वारे दिले आहे. तसेच २-३ महिन्यात संपूर्ण देशाचे लसीकरण अशक्य असल्याचे पत्रकाद्वारे सांगितले आहे.


जगावर ओढावलेले कोरोनारुपी संकट मोठे असल्यामुळे हे संकट रोखण्यासाठी लस खूप मोठे हत्यार आहे. पण लस निर्मिती करताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत असल्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण होण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतील, असे त्यात नमूद केले आहे. जानेवारी २०२१ पासून आपल्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सर्वात प्रथम करण्यात आले. पण इतर देशातील कोरोना संकट पाहता आपण त्यांना मदतीचा हात दिला आणि लस निर्यात केली. त्याचीच प्रचिती म्हणून आज इतर देश भारताला मदत करत आहेत. हा कोरोना देशांच्या सीमेपर्यंत मर्यादीत नसल्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

सर्वाधिक लोकसंख्या आपल्या देशात आहे. लोकसंख्या पाहता दोन ते तीन महिन्यात लसीकरण करणे अशक्य आहे. देशातील लशींची मागणी पाहता आम्ही दिवस रात्र त्यावर मेहनत घेत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.