पहिलवान सुशीलकुमारची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता पहिलवान सुशीलकुमार याची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी १ लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. सुशीलकुमारचा पीए अजय याची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे इनाम जाहीर केले गेले आहे. या दोघांवर पहिलवान सागर धनखड याच्या खुनात सामील असल्याचा आरोप आहे. सुशीलकुमारने यासाठी दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील आणि अजय यांच्याविरोधात यापूर्वीच अजामीनपात्र वॉरन्ट जारी केले आहे.

दिल्ली पोलिसांना या प्रकरणी तपास करताना सुशीलकुमार याचे अनेक गँगस्टर्स बरोबर संबध असल्याचे आढळून आले आहे. छत्रसाल स्टेडियम मध्ये हे गुंड येत असत असेही तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी एनसीआर सह पानिपत, सोनपत, झज्जर, गुरुग्राम सह अनेक ठिकाणी सुशीलकुमारचा शोध घेतला आहे पण तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्याविरुद्द लुक आउट नोटीस जारी केली गेली आहे.

५ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये एका फ्लॅट वरून पहिलवानांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत ५ जण गंभीर जखमी झाले होते त्यात सागरचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. मारामारी संदर्भात झालेल्या चौकशीत सुशीलकुमारचे नाव पुढे आल्यापासून तो फरारी झाला आहे. सुशीलसह नऊ जणांवर अजामीनपत्र वॉरन्ट पोलिसांनी जारी केले आहे.