चीन मध्ये तीन कोटींच्यावर पुरुष, मुली मिळत नसल्याने कुवाँरे

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेत उघड झालेले काही आकडे धक्कादायक आहेत. या आकडेवारी नुसार या घडीला चीन मध्ये ३ कोटींपेक्षा अधिक पुरुष लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अविवाहित आहेत. आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या असलेली अविवाहित पुरुषांची संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट मध्ये या संदर्भात बातमी आली आहे. चीन मध्ये प्रथमपासूनच मुलगा होण्यास अधिक प्राधान्य आहे आणि आजही त्या प्रवृत्तीत बदल झालेला नाही. मुले आणि मुली यांच्या जननदरातील तफावत दीर्घकाळ कमी होण्याची शक्यता नाही. राष्ट्रीय सांखिकी ब्युरोने जाहीर केलेल्या सातव्या जनगणना आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चीन मध्ये १.२ कोटी बालके जन्माला आली. त्यात मुले आणि मुली यांचे प्रमाण १११ मुलांमागे १०० मुली असे आहे. २०१० मध्ये हे प्रमाण ११८ मुलांमागे १०० मुली असे होते.

चीन मध्ये आजही मुलापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलींशी विवाह केला जातो. त्यामुळे या वर्षात जन्माला आलेली मुले जेव्हा लग्नाच्या वयाची होतील तेव्हा त्यांना लग्नासाठी मुली मिळणे आजच्या प्रमाणेच अवघड होणार आहे. चीनी परिवारात आजही मुलाच्या जन्माला प्राधान्य दिले जाते. १९७९ ते २०१६ पर्यंत देशात वन चाईल्ड पॉलिसी राबविली गेली होती त्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढले होते. आज निवडक जोडप्यांना दुसरे मूल जन्माला घालण्याची परवानगी दिली गेली आहे. मात्र तरीही मुले आणि मुली संख्या फरक कमी होण्यास खूप वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे असे तज्ञ सांगतात.