कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोदींची लाट ओसरली; लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरुन सातत्याने टीका होता असतानाच दुसरीकडे या दुसऱ्या लाटेचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही बसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मोदींची लोकप्रियता मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’च्या आकडेवारीनुसार कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरला आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

नरेंद्र मोदी या १३ देशांच्या राष्टाध्यक्षांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये १ एप्रिल ते ११ मे दरम्यान १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग एक एप्रिलपूर्वी ७३ टक्के एवढी होती. पण त्यामध्ये ११ मे रोजी १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग एक मे ते ११ मे दरम्यान १० टक्क्यांनी कमी झाले. १० टक्क्यांची वाढ मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये झाली आहे. २१ टक्क्यांवर एक मे आधी असणारी ही रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचली आहे.

मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचे चित्र केवळ मॉर्निंग कन्सल्टच्या अ‍ॅप्रूवल रेटिंगमध्येच नाही तर भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही दिसत आहे. २३ राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी मोदींची लोकप्रियता ५७ टक्क्यांपर्यंत होती. पण ११ मे पर्यंत यामध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आणि ती थेट ४८ टक्क्यांवर आली. मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच ५० टक्क्यांच्या खाली आल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.


ओआरमॅक्स मिडियाच्या या सर्वेक्षणामध्येच चीनसोबत झालेला वाद आणि चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर पंतप्रधानांची लोकप्रियता ६९ टक्क्यांपर्यंत गेली होती. पण ही लोकप्रियता आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ टक्क्यांनी कमी होऊन ४८ वर आली आहे. ही ६९ टक्के लोकप्रियता या सर्वेक्षणातील मोदींची सर्वात चांगली कामगिरी होती.

यापूर्वी नोटबंदी, कृषी कायदे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारखे निर्णय आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतरही मोदींची लोकप्रियता कायम राहिली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका मोदींच्या लोकप्रियतेला बसल्याचे या दोन्ही सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.