देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारीत होत आहे घट; काल दिवसभरात 2.81 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये काही प्रमाणात कमी आली असली तरी अद्याप परिस्थिती चिंताजनक आहे. काल दिवसभरात देशात दोन लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तीन लाख 78 हजार 741 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर काल दिवसभरात देशात चार हजार 106 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच ही आकडेवारी जारी केली आहे.

दरम्यान भारतात आतापर्यंत 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आतापर्यंत 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तर महाराष्ट्रात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात रविवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रविवारी तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, तर नवीन 34 हजार 389 कोरोनाबाधितांची नोंद झाली. दरम्यान 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत राज्यातील 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रिय रुग्ण आहेत.