इंग्रजांच्या भूमीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया घडवणार इतिहास


नवी दिल्ली: पुढील महिन्यात न्यूझीलंड विरोधात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे. इंग्लंडमझील साऊथम्पटनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना खेळण्यासाठी ज्यावेळी टीम इंडिया मैदानावर उतरेल, तो दिवस भारताच्या 89 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. कारण, आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी भारताने एकही सामना खेळलेला नाही. आयसीसीने कसोटी क्रिकेटसाठी मान्यता दिलेल्या 12 देशांपैकी केवळ 2 देशांनी आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेला नाही.

1999 मध्ये त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्याची संधी भारताकडे आली होती. पण, त्यावेळी टीम इंडिया आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचू शकली नाही. आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये बांग्लादेशातील ढाकामध्ये खेळवली गेली होती.

आतापर्यंत एकही मॅच भारत आणि बांग्लादेशने त्रयस्थ ठिकाणी खेळली नाही. आयसीसीने कसोटी सामना खेळण्यास मान्यता दिलेल्या बारा टीम पैकी भारत आणि बांग्लादेश वगळता इतर देशांनी त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत. या मध्ये सर्वाधिक सामने पाकिस्तान त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने खेळले आहेत. पाकिस्तानने 39, ऑस्ट्रेलिया 12, श्रीलंका 9 , दक्षिण आफ्रिका 7, न्यूझीलंड वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी 6 कसोटी सामने त्रयस्थ ठिकाणी खेळले आहेत. तर अफगाणिस्तानने चार सामने त्रयस्थ ठिकाणी खेळले आहेत.