रोहित पवारांची मोदी सरकारवर खतांच्या दरवाढीवरुन टीका


मुंबई – कोरोना संकटात रासायनिक खतांच्या किंमती केंद्रातील मोदी सरकारने वाढवल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे वाढवलेले खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. केंद्र सरकारने ७०० ते ८०० रुपयांची रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. शंभर पार पेट्रोलच्या किमती असतानाचं केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान, यावरुन आता केंद्र सरकारवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.


खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय, अशी शंका येते. कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!, असे रोहित पवार म्हणाले.


त्याचबरोबर डीएपी मध्ये ५८%, एनपीके मध्ये ५०% तर एनपीएस मध्ये ४५% वाढ केल्याने ही खतं घेण्यासाठी ‘पीएम किसान सन्मान निधी’चे सगळे पैसे खर्च केले तरी ते पुरणार नाहीत. #IFFCO कडील जुना साठा संपल्यास नव्या साठ्यातील खतांवर भाववाढ होणार नाही, याची हमी देणंही गरजेचं आहे. मध्यंतरी बचत ठेवीवरील व्याजदर कमी केले अन टिका होताच नजरचूक झाल्याची सावरासावर केली. आता खताच्या किंमती वाढवल्या आणि टिका सुरु होताच ही किंमत विक्रीसाठी नसल्याचं सांगतायेत. सत्तेसाठी राज्य सरकारवर टिकेच्या फैरी झाडणारे राज्यातील विरोधक याबाबत बोलणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.