मायक्रोसॉफ्टने केली होती बिल गेट्स यांच्या प्रेमप्रकरणाची चौकशी


वॉशिंग्टन – आपल्याच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे प्रेमसंबंध होते. कंपनीकडून या संबंधांची चौकशी सुरु होती. यासंदर्भात द वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अशापद्धतीचे संबंध कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत ठेवणे नियमांचे उल्लंघन असल्यामुळे प्रकरणाची चौकशी सुरु असताना अब्जाधीश असणाऱ्या बिल गेट्स यांनी बोर्डाच्या सदस्यपदी कायम राहणे नैतिकतेला धरुन नसल्याचा निर्णय २०२० मध्ये बोर्डाने घेतला होता.

जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कित्येक वर्ष बिल गेट्स आणि आपल्यात लैंगिक संबंध असल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टच्या एका महिला इंजिनिअरने पत्रातून केला होता. यानंतर २०१९ मध्ये एका कायदा कंपनीला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्ड सदस्यांनी नियुक्त केले होते. जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितल्यानुसार बिल गेट्स यांनी चौकशी पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला.

जर्नलला बिल गेट्स यांच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे संबंध २० वर्षांपूर्वी होते आणि मैत्रीपूर्ण परिस्थितीत ते संपवण्यात आले. त्यांच्या बोर्डातून बाहेर पडण्याचा निर्णयाचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडत असताना आता आपण लोककल्याणावर लक्ष केंद्रीत करणार असल्याने हा निर्णय बिल गेट्स यांनी घेतल्याचे म्हटले आहे.

दरम्यान मायक्रोसॉफ्टने असोसिएट प्रेसला पाठवलेल्या मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा २००० मध्ये बिल गेट्स यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही या प्रकरणी चिंता व्यक्त केली होती. कंपनीने याप्रकरणी चौकशीदेखील केली. या संपूर्ण चौकशीदरम्यान तक्रार करणाऱ्या महिलेला पूर्ण मदत देण्यात आली.

बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. एक संयुक्त पत्रक या दोघांनीही जारी करत यापुढे आम्ही दोघे एकत्र राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. १९९४ साली बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न झाले होते.