ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून सगळे वाईटच घडत आहे; चक्रीवादळावरून नितेश राणेंचे टीकास्त्र


मुंबई – तोक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळ अजूनही मुंबईजवळील समुद्रात घोंगावत असून, अद्याप धोका टळलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन कोरोना संकटातच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर आलेल्या तोक्ते चक्रीवादळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

तोक्ते चक्रीवादळाने गोव्यानंतर रविवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पाऊल ठेवले. चक्रीवादळ रात्रीपासून अद्याप महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून संथ गतीने गुजरातच्या दिशेने जात आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि राज्याच्या इतर भागात या चक्रीवादळामुळे पडझड झाली आहे. देश आणि महाराष्ट्र गेल्या वर्षीही कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.


नितेश राणे यांनी कोरोनाचा उद्रेक झालेला असताना सलग दुसऱ्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवले आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष… २०२० चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), २०२१ चक्रीवादळ. २०२० आणि २०२१मध्ये कोरोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर ग्रहणांचेही बाप आहेत, बॉस, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.