खरोखरचं भारतीय अब्जाधीश महिलेने नारळाचे तेल वापरुन केले होते का कोरोनापासून स्वत:चे संरक्षण?


नवी दिल्ली: भारतीय अब्जाधीश महिला किरण मजूमदार शॉ यांच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. औषधे बनवणारी कंपनी बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ यांनी एका दिवसात चारवेळा नारळाचे तेल नाकावर लावून कोरोनापासून स्वत:चे संरक्षण केल्याचा दावा त्या मेसेजमध्ये केला जातो आहे. व्हाटसअ‌ॅपपासून लिंक्डेनपर्यंत हा मेसेज शेअर होत आहे. आता त्या मेसेजविषयी बायोकॉन कंपनींने स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे बायोकॉन कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये #FakeForwardAlert: किरण मजूमदार शॉ यांच्या नावाने खोटा मेसेज सोशल माडियावर शेअर केला जात आहे. त्यांनी यामध्ये नारळाचे तेले वापरुन कोरोनापासून सुटका करुन घेतल्याचे म्हटले जात आहे, हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. व्हायरल मेसेजमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये, असे कंपनीने म्हटले आहे.


भारतातील कोरोना लसीकरण परिस्थिती ही अरेंज मॅरेजसारखी झाली आहे. आधी तुम्ही लग्नासाठी तयार नसता, नंतर तुम्ही लग्नासाठी तयार होता, त्यावळी तुम्हाला वर किंवा वधु मिळत नाही, अशी तुलना ‘बायोकॉन लिमिटेड’च्या सीईओ किरण मजूमदार-शॉ यांनी केली आहे. शॉ यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सच्याही क्रिएटिव्हिटीला धुमारे फुटले पाहायला मिळाले.

बंगळुरुतील बायोटेक कंपनी ‘बायोकॉन लिमिटेड’ आणि ‘बायोकॉन बायोलॉजिक्स’च्या किरण मजूमदार शॉ या कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. त्याचबरोबर बंगळुरुतील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. 68 वर्षीय किरण मजूमदार-शॉ या भारतीय अब्जाधीश उद्योजक असून त्यांनी फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही स्थान मिळवले होते.