भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा; दररोज गोमूत्र घेत असल्यामुळे आतापर्यंत झाला नाही कोरोना


भोपाळ – पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकताच एक दावा केला की गोमूत्र घेतल्यामुळे कोरोना होत नाही. साध्वींनी सांगितल्याप्रमाणे, रोज गोमूत्रचा अर्क त्या घेतात. त्यामुळेच त्यांना अजुनही कोरोनाची लागण झालेली नाही. त्याचबरोबर यापुढे सुद्धा आपल्याला गोमूत्रामुळे कोरोना होणार नाही. भोपाळमध्ये रविवारी एका कार्यक्रमात हा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे.

खासदार म्हणाल्या, की आपण दररोज गायीच्या मूत्राचा अर्क घेतल्यास फुफुसांमध्ये संक्रमण राहत नाही. मी कठिण परिस्थितीतून जात आहे, पण रोज गोमूत्र अर्क घेत असल्यामुळेच मला कोरोनासाठी कोणत्याही औषधी घेण्याची वेळ आलेली नाही. मी कोरोनाग्रस्त नाही आणि ईश्वर मला कोरोनाबाधित करणारही नाही. कारण त्या औषधीचा उपयोग मी करत आहे. होय, मी प्रार्थना करून गोमूत्र घेते. हे अमृततुल्य आहे. ते मी ग्रहण करत आहे. माझे आयुष्य राष्ट्रासाठी आहे. गोमूत्र जीवनदायी असते.

साध्वी यांनी पुढे सांगितले, की केवळ देशी गायीचे मूत्र उपयोगी असते. यात त्यातही जंगलात चरणाऱ्या गायीचे मूत्र औषध स्वरुपी असते. मूत्राला स्वच्छ कपड्याने 16 वेळा स्वच्छ करावे. हे एका अॅसिडप्रमाणे काम करते. यामुळे पोट पूर्णपणे स्वच्छ होते. पोटात कुठलेही विकार होत नाहीत.

भोपाळच्या गोवर्धन बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद नेमा यांनी सांगितल्याप्रमाणे, औषधी म्हणून गोमूत्राचा वापर केला जाऊ शकतो. हे अनेक आजारांमध्ये ठरू शकते. प्रामुख्याने पोटाच्या विकारांसाठी हे उपयुक्त आहे. पण, गोमूत्राचे सेवन केल्याने कोरोना थांबतो किंवा होत नाही असा दावा करता येणार नाही. कर्करोगावर सुद्धा केवळ प्राथमिक स्तरावर हे काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. गोमूत्र पिण्याचे फायदे असले तरीही ते थेट नव्हे, तर एका प्रक्रियेनंतर घेतले जावे.