हे ब्रेसलेट देईल करोना लस पासपोर्टचा पुरावा

कॅलिफोर्नियातील ‘इम्युनबँड’ या स्टार्टअप कंपनीने हातात घालायचे एक ब्रेसलेट विकसित केले आहे आणि केवळ २० डॉलर किमतीत मिळणारे हे ब्रेसलेट अल्पावधीत खुपच लोकप्रिय ठरले आहे. या ब्रेसलेटची खासियत म्हणजे यात युजर, कोविड १९ लस पासपोर्ट, त्याच्याशी संबंधित खरी कागदपत्रे डिजीटली सुरक्षित ठेऊ शकतो. हे ब्रेसलेट एखाद्या रिस्ट बँड प्रमाणे दिसते.

या ब्रेसलेट मध्ये नाव, पत्ता, लसीकरणाची वेळ, पुढचा डोस, कोणत्या कंपनीची लस या माहितीबरोबर करोना संदर्भातली अन्य माहिती साठविता येते. युजर गरज भासेल तेव्हा क्यूआर कोड स्कॅन करून ही माहिती आवश्यक तेथे सादर करू शकतो.

बऱ्याच युरोपीय देशांनी करोना पासपोर्ट वापरण्याचा निर्णय घेतला असल्याने हे ब्रेसलेट अन्य देशात जाताना लसीकरणाची माहिती देण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ पर्याय बनले आहे. त्यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय ठरले असल्याचे सांगितले जात आहे. हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करता येते आहे.