केदारनाथ मंदिर उघडले, जनकल्याणासाठी मोदींच्या वतीने झाली पहिली पूजा

उत्तराखंड चारधाम यात्रेतील केदारनाथ धाम मंदिर आज म्हणजे १७ मे रोजी पुन्हा उघडले गेले असून पहाटे पाच वाजता शुभमुहूर्तावर हे मंदिर उघडले गेले. यावेळी करोना मुळे भाविकांसाठी चारधाम यात्रा स्थगित केली गेली आहे. त्यामुळे तीर्थ पुरोहित, पंड्या समाज असे मोजकेच लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी भाविकांना घरातूनच पूजा करण्याचे आवाहन केले आहे.

पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी सांगितले की चारधाम यात्रेत केदारनाथाची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने जनकल्याणासाठी केली गेली. शनिवारी सायंकाळी केदार भगवानाची पंचमुखी डोली केदारनाथ धाम मध्ये आणली गेली. बद्रीनाथ धाम मंदिर १८ मे रोजी पहाटे ४ वा.१५ मिनिटांनी खुले होणार आहे. रविवारी नृसिंग मंदिरातून आदि शंकराचार्य गादी, रावळ ईश्वर प्रसाद नंबुद्री यांच्यासह योगध्यान बद्री मंदिर पांडूकेश्वर मंदिरात पोहोचली असून ती सोमवरी सायंकाळी बद्रीधाम मध्ये येणार आहे.