साजरा झाला वर्ल्ड व्हिस्की डे, असा आहे व्हिस्कीचा इतिहास

आनंद सेलिब्रेट करायचा आहे, फार उदास वाटतेय, दुःखाचा विसर पाडायचा आहे तर जगभरातील अनेक लोक मद्याचा सहारा घेतात हे सर्वश्रुत आहे. आज अनेक प्रकारचे खास दिवस साजरे करण्याची प्रथा पडली आहे. त्याचप्रमाणे २०१२ पासून मे महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक व्हिस्की डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस या वर्षी १५ मे रोजी साजरा झाला.

व्हिस्की हे एक प्रकारचे मद्य असून त्यालाही इतिहास आहे. व्हिस्की जगभरात अनेक लोकांना विशेष पसंत आहे. भारतात सुद्धा व्हिस्की प्रेमींची संख्या मोठी आहे. ‘व्हिस्की वर्ल्ड डे’ मे महिन्यातील तिसऱ्या शनिवारी साजरा केला जात असला तरी आंतरराष्ट्रीय व्हिस्की दिवस २७ मार्च रोजी साजरा होतो.

‘Usquebaugh ‘ या शब्दापासून व्हिस्की हा शब्द आला असे मानतात. ओशकीबे असा उच्चार असलेल्या या शब्दाचा अर्थ जीवनजल असा आहे. हाच शब्द छोटा करून व्हिस्की हा शब्द आला असे म्हटले जाते. वर्ल्ड व्हिस्की डे साजरा करण्याचे महत्व म्हणजे लोक एकत्र येऊन परिवार, मित्रांसह आनंद लुटतात. सोशल मीडियावर दरवर्षी ‘हॅशटॅग वर्ल्ड व्हिस्की डे’ चालविले जाते. यामुळे जगभरातील लोक सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. तेथे एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

इतिहासात व्हिस्कीचा पहिला उल्लेख येतो स्कॉटलंडच्या पुस्तकात तोही १५ व्या शतकात. आयलंड आणि स्कॉटलंड, व्हिस्की त्यांचीच असे परस्परांवर दावे करत आले आहेत. अमेरिकेत १८ व्या शतकात व्हिस्कीचे उत्पादन सुरु झाले. स्कॉटलंड मध्ये ५०० वर्षे कडक नियम पाळून व्हिस्की उत्पादन होते आहे. येथील व्हिस्की सर्वात उत्तम प्रतीची मानली जाते. त्याला स्कॉच व्हिस्की म्हणतात. गहू, ज्वारी, राई, मका या धान्यापासून व्हिस्की बनते. या धान्यांना मोड आणून त्यापासून बनणाऱ्या व्हिस्कीला माल्टा व्हिस्की म्हणतात. स्कॉटलंड मध्ये व्हिस्की तयार झाल्यावर किमान तीन वर्षे ती लाकडी पिंपात साठवून ठेवली जाते. जितकी अधिक ती मुरेल तितकी त्याची गुणवत्ता वाढते असे तज्ञ सांगतात.