दैवाने दिले कर्माने नेले

दैव देते आणि कर्म नेते अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे नशिबाने मिळाले तरी आपल्या कर्माने ते वाया जाते. कॅलिफोर्नियातील एक महिला या म्हणीचा अनुभव सध्या घेते आहे. नशिबाने तिला १९० कोटी रकमेची लॉटरी लागली पण तिने ते तिकीट पँटच्या खिशात ठेवले होते आणि खिसा न तपासता तिने पँट लाँड्री मध्ये धुवायला दिली आणि आता या महिलेपाशी ते तिकीट नाही. त्यामुळे बक्षिसाची रक्कम तिला मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला नेहमीच नशिबाची परीक्षा घेण्यासाठी लॉटरी तिकिटे खरेदी करते. यावेळी तिने तसेच केले आणि नेहमीच्या दुकानातून तिकीट घेतले. गेल्या नोव्हेंबरमधील या तिकीटाने २६ दशलक्ष डॉलर्सचा जॅकपॉट जिंकला पण गेल्या गुरुवारी क्लेमचा शेवटचा दिवस होता तेव्हा ही महिला बक्षिसाचा क्लेम करण्यासाठी आली. तिने बक्षीस मीच जिंकले आहे पण तिच्याजवळ तिकीट नसल्याचे सांगून घडलेली हकीकत सांगितली. पण नियमानुसार तिकीट न दाखविता बक्षीस रक्कम देणे शक्य नव्हते.

शेवटी ती ज्या दुकानातून तिकीट खरेदी करते तेथे चौकशी केली तेव्हा या महिलेने तिकीट खरेदी करून पँटच्या खिशात ठेवल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. जॅकपॉट नंबर तिकीट त्याच दिवशी विकले गेल्याचेही सिद्ध झाले. पण अजूनही बक्षीस द्यायचे का नाही यावर निर्णय झालेला नाही. या संदर्भात अजून तपास केला जात आहे. योग्य पुरावे मिळाले तर महिलेचा दावा मान्य केला जाईल अन्यथा ही रक्कम शाळेला दान केली जाईल असे सांगितले जात आहे.

लॉटरीच्या इतिहासात जॅकपॉट तिकीट हरविल्याची घटना प्रथमच नोंदविली गेल्याचे सांगितले जात आहे.