चीनी लस घेतलेल्या पाकिस्तानींना सौदीने केली प्रवेश बंदी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाऊन आले असताना दोन दिवसापूर्वी सौदीने पाकिस्तानी नागरिकांच्या बाबत एक कडक नियम जारी केला आहे. त्यानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी करोना साठी चीनी लस घेतली आहे त्यांना प्रवेश बंदी केली गेली आहे असे समजते. दोन दिवसापूर्वी सौदीने पाकिस्तानी नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल असा निर्णय घेतला होता पण तो आता बदलला गेला असून चीनी लसीकरण झाले असेल तर त्या पाकिस्तानी लोकांना सौदीत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे सौदीने चीनच्या साईकोवॅक आणि साईनोफार्म या दोन्ही करोना लसीना मान्यता दिलेली नाही. चीनने लस डिप्लोमसी खाली सौदीला या लसीचे डोस पाठविले होते पण सौदीने त्याचा वापर केलेला नाही असेही समजते.

ज्या पाकिस्तानी नागरिकांनी चीनी लस घेतलेली नाही त्यांना मात्र १४ दिवस विलगीकरणात स्वखर्चाने राहावे लागणार आहे. सौदीने चार करोना लसींना परवानगी दिली आहे. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि एस्ट्राजेनेका लसींचा त्यात समावेश आहे.