राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला: उद्धव ठाकरे


मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. राजीव सातव यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून हिंगोलीकडे रवाना करण्यात आलं आहे.


दरम्यान राजीव सातव यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


तसेच राजीव सातव यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं,देशानं एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ट्विटरवर त्यांच्या सोबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.

गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहेत.