या जमीनीत तुम्हाला जर हिरा सापडला तर तो तुमच्या मालकीचा


हिरा हा किती मौल्यवान असतो याची माहिती तर तुम्हाला असेलच त्याचबरोबर हिरा हा केवळ खाणीतच सापडतो. जगभरात अशा हिऱ्यांच्या खूप खाणी आहेत. ज्यातून अनेक हिरे काढण्यात आले आणि अनेक कंपन्या यांच्या माध्यमातून श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचल्या. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा जागेबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती देखील हिरा शोधू शकते. त्याच बरोबर त्या व्यक्तीला जर हिरा सापडला तर तोच त्याच मालक असतो.

अमेरिकेच्या अरकान्सास राज्याच्या पाइक काउंटी क्षेत्रातील मरफ्रेसबोरोमध्ये ही खाण आहे. येथील अरकान्सास नॅशनल पार्कमध्ये ३७.५ एकराच्या शेतातील जमिनीवरच हिरे सापडतात. १९०६ पासून येथे हिरे मिळणे सुरू झाल्यामुळे ‘द क्रेटर ऑफ डायमंड्स’ असेही या ठिकाणाला म्हटले जाते.

जॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला ऑगस्ट १९०६ मध्ये त्याच्या शेतात दोन चमकते दगड मिळाले होते. हे दगड त्यांनी एक्सपर्टला दाखवले तर कळाले की, हे हिरे आहेत. जॉनने त्यानंतर त्याची २४३ एकर जमीन एका डायमंड कंपनीला चांगल्या किंमतीत विकली. डायमंड कंपनीने १९७२ मध्ये खरेदी केलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर डायमंड कंपनीकडून अरकान्सास डिपार्टमेंट ऑफ पार्क अॅन्ड टूरिज्मने जमीन खरेदी केली आणि हे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले. पण सर्वसामान्य लोकांना या खाणीत हिरे शोधण्यासाठी नाममात्र फी द्यावी लागते.

आतापर्यंत हजारो हिरे या शेतातून लोकांना मिळाले आहेत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनुसार, या जमिनीवर १९७२ पासून आतापर्यंत ३० हजारांपेक्षा अधिक हिरे मिळाले आहेत. याच जमिनीत ‘अंकल सेम’ नावाचा हिरा मिळाला होता. हा हिरा ४० कॅरेटचा होता. हा अमेरिकेत मिळालेला सर्वात मोठा हिरा आहे. येथे सापडणारे हिरे सामान्यपणे छोट्या आकाराचे असतात. येथे चार ते पाच कॅरेटचे हिरे अधिक सापडतात. मोठ्या संख्येने येथे लोक हिरे शोधण्यासाठी येतात. यात आता ज्याचे नशीब चांगले त्याला हिरे सापडतात तर काहींना हाती काहीच लागत नाही.

Leave a Comment