अशा प्रकारे करा तुमचा आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक


नवी दिल्ली : आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) तुमचा आधार क्रमांक सुरक्षित राहावा आणि त्याचा कुणीही दुरुपयोग करु नये म्हणून एक नवे फिचर आणले आहे. नागरिकांना या नव्या फिचरचा उपयोग करुन आपला आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे. नागरिकांचा आधार क्रमांक गुप्त आणि सुरक्षित राहावा यासाठी UIDAI ने हे पाऊल उचलले आहे. तुम्ही तुमचा आपला आधार क्रमांक या फिचरचा उपयोग करुन लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली मार्गांचा उपयोग करु शकता.

आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी UIDAI च्या (uidai.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या अथवा UIDAI ला 1947 या क्रमांकावर SMS करुन तुम्ही ही सुविधा वापरु शकता.

UIDAI च्या संकेतस्थळावरुन आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा. येथे आधार सर्विसेसमध्ये (Aadhaar services) ‘माय आधार’वर (My Aadhaar) जाऊन आधार लॉक/अनलॉकवर क्लिक करा. लॉक UID च्या पर्यायाला निवडा आणि तेथे आपली माहिती भरा. या ठिकाणी तुम्हाला आपला आधार क्रमांक, आधारवरील नाव, पिन कोड आणि सिक्युरिटी कोड द्यावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. हा OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे येईल. OTP 10 मिनिटांसाठीच वैध असेल. OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केले की तुमचा आधार क्रमांक लॉक होईल.

आधार क्रमांक अनलॉक करण्यासाठी सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा. येथे आधार सर्विसेसमध्ये (Aadhaar services) ‘माय आधार’वर (My Aadhaar) जाऊन आधार लॉक/अनलॉकवर क्लिक करा. येथे अनलॉक UID पर्याय निवडा आणि प्रथम तयार केलेला व्हर्चुअल ID आणि सिक्युरिटी कोड टाका. आता Send OTP वर क्लिक करा. हा OTP तुमच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे येईल. OTP 10 मिनिटांपर्यंत वैध असेल. आता OTP टाका आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर आधार क्रमांक अनलॉक होईल. जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर तुम्ही SMS द्वारे आपला आधार क्रमांक लॉक/अनलॉक करु शकता.

एसएमएसद्वारे आधार क्रमांक लॉक करण्यासाठी OTP मिळवण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावरुन 1947 वर “GETOTP (आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक)” हा SMS पाठवा. उदाहरणार्थ जर तुमचा आधार क्रमांक 1234 5678 9876 आहे. तर तुम्हाला GETOTP 9876 हा SMS 1947 वर पाठवावा लागेल. तुम्ही SMS पाठवला की UIDAI तुम्हाला SMS द्वारे 6 अंकी OTP पाठवेल. त्यानंतर तुम्हाला आणखी एक SMS पाठवावा लागेल. हा SMS “LOCKUID (आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आणि 6 अंकी OTP)” या स्वरुपात पाठवावा लागेल. तुम्ही हा SMS 1947 वर पाठवला की UIDAI तुमचा आधार क्रमांक लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल.

एसएमएसद्वारे आधार क्रमांक अनलॉक करण्यासाठी OTP मिळवण्यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर SMS पाठवा. SMS चे स्वरुप “GETOTP (वर्चुअल ID क्रमांकाचे शेवटचे 6 अंक)” SMS पाठवल्यानंतर UIDAI 6 अंकी OTP पाठवेल. आधार क्रमांक अनलॉक करण्यासाठी आता दूसरा SMS पाठवा. तो SMS “UNLOCKUID (वर्चुअल ID चे शेवटचे 6 अंक 6 अंकी OTP)” हा SMS 1947 क्रमांकावर पाठवला की UIDAI तुमचा आधार क्रमांक अनलॉक करेल. याबाबत तुमच्याकडे एक कन्फर्मेशन मेसेजही येईल.

Leave a Comment