रोज आंघोळ करणे अनावश्यकच नव्हे; तर घातकही

Bath
लंडन: रोज आंघोळ करणे हा आवश्यक शिष्टाचार मानला जातो. विशेषत: भारतात आंघोळ हा दिनक्रमाचा अत्यावश्यक भाग मनाला जातो. मात्र रोज आंघोळ करणे केवळ अनावश्यक आहे असे नव्हे; तर त्वचेच्या आणि एकूण शरीराच्या आरोग्यासाठी घातकही असल्याचा शोध कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी लावला आहे.

रोज आंघोळ करण्याने त्वचा रुक्ष होते. त्वचेला सूक्ष्म भेगा पडतात. या भेगांमधून घातक जंतू, विषाणू शरीरात प्रवेश करतात; असे विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ नर्सिंग’मधील संसर्गजन्य रोग विभागाचे विशेषज्ञ डॉ. एलेन लार्सन यांच्या नेतृत्वाखालील गटाने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

प्रत्येकाच्या शरीराला नैसर्गिकरित्या एक विशिष्ट स्वरूपाचा सुगंध असतो. वारंवार आंघोळ करण्याने हा सुगंध नष्ट होतो. त्याचप्रमाणे शरीरामधून त्वचेवर विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक तेल पसरते. हे तेल त्वचेला मुलायम बनविण्याबरोबरच आरोग्यपूर्ण घटकांचा पुरवठा करते. आंघोळ केल्यानंतर हे तेल नष्ट होऊन त्वचा रुक्ष होते; असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

शरीर घामाने थबथबलेले असेल, त्वचेला दुर्गंधी येत असेल; तर स्नान करणे योग्य आहे. मात्र तसे नसताना केवळ एक उपचार म्हणून नियमित आंघोळ करण्याची गरज नाही; असे डॉ. लार्सन यांचे म्हणणे आहे. लोकांना आपण आपले शरीर स्वच्छ ठेऊन आरोग्यसंपन्न राहण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे; असे वाटत असते. मात्र ते जीवशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे; असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे आंघोळीसाठी जंतुनाशक हँडवॉश, पारंपारिक साबण अथवा अन्य साधने आवश्यक असतात; ही देखील गैरसमजूत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment