न संपणारे आईसक्रीम पुराण


उन्हाळा म्हणजे आईसक्रीम हे नाते आता कधीच संपले असून कोणताही ऋतू असला तर आईसक्रीम हवे हा नवा ट्रेंड चांगलाच रुळला आहे. आईसक्रीम न आवडणारी व्यक्ती बहुदा अजून जन्माला यायची असेल. काळ बदलला तश्या आईसक्रीम च्या व्हरायटी वाढत चालल्या असे म्हणता येइल. आईसक्रीम हा पदार्थच असा आहे की त्यावर कितीही बोलले तर कमीच. आईसक्रीम चा इतिहास तर न संपणारा. रोज काही न काही नवीन माहितीची त्यात भर पडतच असते. सर्वप्रथम हा अफलातून पदार्थ कुठे बनला ते जगातील सर्वात महागडे आईसक्रीम इथपर्यत अनेक प्रकारची माहिती या इतिहासात आहे. आईसक्रीम विषयी अजून काही जाणून घेणे तितकेच मनोरंजक आहे.


असे सांगतात १६७१ मध्ये प्रथम ब्रिटनचा राजा चार्ल्स २ याने आईसक्रीम खाल्ले आणि या पदार्थाच्या तो प्रेमातच पडला. त्याचे आईसक्रीम प्रेम इतके वाढले कि शेफने आईसक्रीम ची रेसिपी कुणालाही देऊ नये म्हणून चार्ल्स २ ने शेफला आजीवन पेन्शन दिले. आईसक्रीम कसे बनले याचे पहिले लिखित रेकॉर्ड सिरियात १७८० पूर्व मध्ये सापडले आहे. एका शिलालेखावर प्राचीन लिपी मध्ये ही माहिती आहे. त्यानुसार राजा मारी बर्फाचे घर बनवून त्यात बर्फ साठवीत असे. पहाडावरून हा बर्फ आणला जात असे आणि पर्शियन लोक फळांचे रस या बर्फात ठेऊन गोठले कि खात असत. त्याला यखचल असे म्हटले जी. यख म्हणजे बर्फ आणि चल म्हणजे खड्डा.


जगजेत्ता सिकंदर आईसक्रीमप्रेमी होता. तो मध आणि फुलांची विविध सरबते यापासून बनविलेले आईसक्रीम खात असे. चीनी राजा तेंग दुधाचे आईसक्रीम खात असे. युरोप मध्ये मार्को पोलो या जाग्प्रवाश्याने १२५४-१३२४ पूर्व आईसक्रीम ची रेसिपी पोहोचविली. फ्रांसचा राजा हेन्री दोन याने इटलीच्या राज्कुमारीशी विवाह केला तेव्हा ती माहेराहून आईसक्रीम बनविणारा शेफ सोबत घेऊन आली होती.

गुजराथ मध्ये जेवणानंतर स्वीट डिश म्हणून आईसक्रीम खाण्याची प्रथा बोकाळली आहे. बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी आंबा स्वादाचे हॅवमोर कंपनीचे आईसक्रीम खाल्ले होते आणि त्यांना ते खूपच आवडले होते. शिल्पा शेट्टीने हाँगकाँग मध्ये आईसक्रीमचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती गोल्ड प्लेटेड आईसक्रीम खाताना दिसली होती. हे आईसक्रीम भारतात मुंबई, हैद्राबाद आणि अहमदाबाद मध्ये मिळते. त्यात २४ कॅरेट गोल्डचा वर्ख लावलेला असतो आणि हे आईसक्रीम १७ पदार्थापासून बनविले जाते. या आईसक्रीमच्या एका कपची किंमत १ हजारापासून आहे.


तुर्की स्पेशल आईसक्रीम विरघळत नाही. ते विरघळू नये म्हणून त्यात आर्किडची फुले घातली जातात. जुलै मधला ३ रा रविवार हा आईसक्रीम संडे म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी हाताने लिहिलेली व्हॅनीला आईसक्रीमची कृती आजही कॉंग्रेस लायब्ररीत जपून ठेवली गेली आहे. जगात आईसक्रीमचा सर्वाधिक आवडता स्वाद व्हॅनीला असून त्यापाठोपाठ चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेव्हरचा नंबर लागतो.


जगातील सर्वात महाग आईसक्रीमची किंमत ६० हजार डॉलर्स असून त्याचे नाव आहे अॅब्सरडीटी संडे. या आईसक्रीम सोबत हॉलिडे पॅकेज मोफत दिले जाते. सेरेंडीपिटी आईसक्रीमची किंमत २५ हजार डॉलर्स असून त्यात फ्रोजन हॉट चॉकलेट सोन्याच्या कटोरीत दिले जाते, बेसवर हिरे बसविलेले असतात. बिघडलेला मूड पुन्हा येण्यासाठी, मन शांत राहावे म्हणून, शारीरिक थकवा घालाविण्यास्ठी, हाडांचे पोषण व्हावे म्हणून, तोंड आले म्हणून कोणत्याही कारणाने आईसक्रीम जगभर चापले जाते.

Leave a Comment